अमर हिंद मंडळ, दादर या समाजसेवी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या अमर ऊर्जा पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून समाजसेवा, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण रक्षण आणि कला-क्रीडा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ८६ अर्जांमधून ५ संस्थांची ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२४ – २५’साठी निवड करण्यात आली आहे. अमर ऊर्जा पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून समाजसेवा, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण रक्षण आणि कला-क्रीडा प्रत्येक गटातील एका संस्थेची निवड करून त्यांना एक लाख रुपये (१,००,०००/-) रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपातील ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ देऊन गौरविणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराचे वितरण अमर हिंद मंडळ, गोखले मार्ग उत्तर, दादर पश्चिम मुंबई ४०००२८ येथे
शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ६.३० वाजता संमारभ पूर्वक होणार आहे.
पुरस्कार प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे.
१ . सेवासाधना प्रतिष्ठान’ ता. चिपळूण, गाव केतकी.
२. प्रार्थना फाऊंडेशन, ता मोहोळ जि सोलापूर, मोरवंची.
३. नाना पालकर स्मृति समिति, परळ.
४. पाणवठा फाउंडेशन, वांगणी बदलापूर.
५. श्रीरंग चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई.
या पुरस्कार वितरण समारंभावेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे
असे आवाहन अमर हिंद मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणीने केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर स्वातंत्र्य चळवळींचे वारे जोरदारपणे वाहत होते. फाळणीनंतरच्या जातीय दंग्यांच्या काळात हिंदू-मुसलमानांचा परस्परांवरील विश्वास उडाला होता. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली आणि गस्त, पहारे सुरू केले. यातूनच हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांची व प्रकाशभाईंची ओळख झाली. गस्त आणि पहा-यांच्या निमित्ताने हुतूतूचे सामने भरवण्यापासून सुरू झालेल्या कार्यातून मग चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. या अनुषंगाने बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. प्रकाशभाई मोहाडीकरांनी ‘अमर हिंद मंडळा’ची घटना, नियम यांचा आराखडा आपल्या सहका-यांसमोर मांडला. तो एकमताने मंजूर झाला आणि २६ जानेवारी १९४७ रोजी ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे ठरविले. मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळाला स्वतःची जागा मिळावी यासाठी इंजिनीयर नानासाहेब मोडक, काकासाहेब गाडगीळ, डॉ.राऊत आणि इतरांनी प्रयत्न केले आणि आज ज्या जागेत मंडळाची वास्तू उभी आहे ती जागा मंडळाला मिळाली.
सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ