अमर हिंद मंडळाचा इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळात देशामध्ये स्वातंत्र्य चळवळींचे वारे वाहू लागले त्याचबरोबर समाजात धर्मियांमध्ये जातीय दंगलींना सुरवात झाली होती. अशावेळी नागरीकांना सजग करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग विविध सामाजिक संस्थांकडून स्वयंसेवकांकडून होत होते. त्यावेळी दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली. हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांनी हुतूतूचे सामने भरवून नागरीकांना जागते ठेवण्याचा प्रयोग केला. पुढे या लोकांची प्रकाशभाईं मोहाडिकरांची ओळख झाली. यातून जनजागरणासाठी चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. ह्याच मंडळींच्या एकत्रीत कार्याने २६ जानेवारी १९४७ रोजी ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना झाली. नंतर बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. या मंडळींनी वसंतव्याख्यानमालेचे तसेच संगित व नाट्य कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्याचे ठरविले. सुप्रसिद्ध व्याख्यानमालेचे पहिले ज्ञानसत्र १५ एप्रिल १९४८ ते २२ एप्रिल १९४८ या आठ दिवसांत आयोजित करण्यात आले. ही व्याख्यानमाला डॉ. डिसिल्व्हा हायस्कूल कंपाऊंड येथे सुरू झाली. १९४८ सालापासून आजपर्यंत अखंडितपणे ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ही एकमेव संस्था आहे.

उपरोक्त कार्यक्रम मंडळाच्या जागेत व्हावे त्यासाठी मंडळाची स्वत:ची जागा असावी ही इच्छा बळावली आणि मंडळासाठी जागेचा शोध सुरु झाला. हि जागा मिळविण्यासाठी काकासाहेब गाडगीळ, इजिनियर मोडक, डॉ.राऊत इत्यादी मान्यवरांनी प्रयत्न केले. १९४९ मध्ये अमर वाडी, गोखले मार्ग उत्तर, दादर (पश्चिम) येथे अमर हिंद मंडळाची वास्तू उभी राहिली. वसंत व्याख्यानमालेच्या आयोजनासोबत संगीत वाद्यवृंदाचे कार्यक्रम नाट्यमहोत्सव होऊ लागले. व्याख्यानमालेमध्ये ज्यांची भाषणे झाली त्यात श्री.ना.म.जोशी, सेनापती बापट, श्री.दादासाहेब मावळंणक, आचार्य अत्रे, प्रा.ना.सी.फडके यांचा प्रमुख सहभाग होता. तर संगीत महोत्सवात लता मंगेशकर, आशा भोसले, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, हिराबाई बडोदेकर, राम मराठे, सरस्वती राणे, तबला नवाज अल्लारखाँ आणि बालगंधर्व अशा दिग्गज गायक-गायिकांनी, वादकांनी आपल्या कलेचा आविष्कार प्रकट केला. महंमद रफी या संगीत महोत्सवात गायिले. त्यानंतर काही वर्षे वसंतव्याख्यानमालेला जोडून नाट्यमहोत्सवाचे आयेजन केले गेले त्यात आचार्य अत्रे लिखित ‘कवडीचुंबक’ या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगात स्वत: आचार्य अत्रे, वसंत बापट, शिरीष पै, अप्पा पेंडसे, प्रबोधनकार ठाकरे व प्रकाश भाई यांनी कामे केली होती. याच नाट्य महोत्सवात अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग सादर केले गेले.

या वास्तूमध्ये सुरुवातीच्या काळात शुश्रुषा पथक, बँण्ड पथक, लेझीम पथक, कुस्तीचा हौदा, व्यायामशाळा, हुतूतू आणि खो-खो खेळाचा सराव सुरु झाला. मराठी मातीतील खेळांना प्राधान्य देण्याचे काम होत असतानाच अमर हिंद मंडळ हे सांस्क़ृतिक केंद्र व्हावे की, क्रीडा संकुल व्हावे हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान प्रकाशभाई मोहाडिकर मंडळापासून दुरावण्यात झाले. काही काळाने राजाभाऊ शेट्टे आणि नारायण पडते यांच्यामध्ये देखील वैचारिक मतभेद निर्माण झाले. राजाभाऊ शेट्टे देखील मंडळातून बाहेर पडले आणि मंडळाचा कारभार साभाळण्याची संपूर्ण जबाबदारी नारायण पडते यांच्यावर पडली. एका बाजूला आर्थिक विवंचनेत सापडलेले मंडळ तर दुस-या बाजूला राजकिय वजन वापरुन मंडळाची वास्तू बळकावण्यासाठी टपून बसलेले संधी साधू यांच्याशी सामना करत नारायण पडते यांनी अमर हिंद मंडळ अपप्रवृत्तींच्या हाती जाण्यापासून वाचवले. साधारणपणे १९७०-१९७१ मध्ये भाई मयेकर, १९७६ मध्ये ऑड.मुंकुदराव तिवरेकर तर त्याचदरम्यान विद्युतमधुन उमेश शेणॉय, सतिस रेडिज तर विजय क्लबकडून श्रीकृष्ण राणे इत्यादी मंडळी आली. १९८० साली काही कार्यकर्त्यांनी पदर मोड करुन राजाभाऊंनी मागणी केलेले पैसे परत केले आणि राजाभाऊंनी मंडळावर केलेला दावा काढून घेतला. त्याचदरम्यान मंडळाची वास्तू मंगलकार्यासाठी भाडेतत्वावर देण्याची योजना आखण्यात आली. १९८३ पासून प्रकृती अस्वास्थामुळे नारायण पडते यांनी भाई मयेकर यांचेवर मंडळाची जवाबदारी सोपवली. भाई मयेकरांच्या कार्यकारणीमध्ये उमेश शेणॉय, श्रीधर भोसले, एकनाथ साटम, दिनकर पाटील, अनंत भालेकर, मधुकर फडके, उषा मेहता, चिंतामणी नागले इत्यादींचा समावेश होता. पुढे विश्वस्त मंडळ आणि कार्यकारणीमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. मंडळाला आर्थिक स्थैर्य मिळू लागले होते. मंडळात समाजसेवी कार्यक्रम/उपक्रमांना बळकटी येऊ लागली होती. अशात पुन्हा एकदा वैचारिक मतभेदांनी डोकेवर काढले. मंडळाच्या वास्तूचा उपयोग पूर्णपणे व्यवसायिक व्हावा असे मत असलेल्या गटाच्या अधिपत्याखाली कार्यकारणी जाऊ पाहत असतानाच उमेश शेणॉय यांनी चिंतामणी नागले, अरुण देशपांडे, दिपक पडते, सतिश रेडिज, श्रीकृष्ण राणे यांना सोबत घेऊन तर विनोद हडप, संजय पेडणेकर, प्रफुल्ल पाटील, विजय राणे, दत्ता सावंत, विलास कारेकर इत्यादी तरुण कार्यकर्त्यांना हाताशी धरुन अमर हिंद मंडळाची रुळावरुन घसरु पाहत असणारी गाडी योग्य मार्गाने वाटचाल करेल अशी खबरदारी घेतली.

१९९५ मध्ये झालेली निवडणूक ही मंडळाच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्वाची आणि दिशादर्शी अशी निवडणूक ठरली. तेव्हापासून मंडळाची अत्यंत योग्य दिशेने आणि सर्वांगिण विकासमय अशी वाटचाल सुरु झाली. या वाटचालीत अनेक पदाधिकारी कार्यकारी सदस्य, तहहयात सदस्य, कार्यकर्ते, खेळाडू/कलाकार यांनी मंडळाला वेळोवेळी अत्यंत मौल्यवान असे सहकार्य केले आहे. यासर्वांच्या सहभागामुळे आणि दिशादर्शी मार्गदर्शनामुळे मंडळाचे भवितव्य अत्यंत उज्वल आहे.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading